घोटबोर हा एक बोरकुळातील वृक्ष आहे. घोटबोर हा वृक्ष बोराच्या झाडापेक्षा लहान आणि वेडा वाकडा वाढणारा. सामान्यतः परिचित नसलेल्या या वृक्षाकडे बघितल्यास बोराचा वृक्ष आहे असे वाटते. घोटबोर कमी, मध्यम पावसाच्या ठिकाणी मुरमाड, खडकाळ पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवर, डोंगर उतारावर कडाकपारीत वाढणारा काटेरी पानगळ होणारा वृक्ष. खोड बऱ्याच ठिकाणी वेडेवाकडे वाढलेले दिसुन येते. जुन्या वृक्षाची खोडाचीसाल काळपट तपकिरी रंगाची, उभ्या वाळलेल्या पापुद्राच्या पट्ट्या निघालेल्या असतात. हॉलो दोन काटे एक सरळ आणि एक हुका सारखा पानाच्या देठाजवळ असतात. पानगळ हिवाळ्याच्या शेवटी होते. पानगळीचा काळ जमिनीच्या प्रकारानुसार कमी अधिक असतो. पान बोराच्या पानासारखीच पण थोडी मोठी आणि कडा कत्री असतात. हिरवट पिवळसर रंगाची छोटी, दाटीने, संख्येने येणारी फुले जून ते सप्टेंबर मध्ये येतात. गळून गेलेल्या फुलांच्या जागेवर फळधारणेला सुरुवात होते. सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये फुलं व फळ एका वेळी झाडावर दिसतात. फळ इंचभर आकाराची गोलसर कठीण कवचाची, हिवाळ्याच्या मध्यापर्यंत परिपक्व होतात. फळ दिसायला बोरासारखीच, पण कमी गर असलेली. पिकल्यावर जांभळट लाल रंगाची. सुकल्यावर गर्द तपकिरी रंगाची होतात. फळ खाण्यालायक नसतात. फळांमध्ये टॅनिन असतं. लाखेच्या किड्यांसाठी उपयुक्त वृक्ष.