कमी, मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, उष्ण, कोरड्या हवामानात वाढणारा वेल. बोर वृक्षाच्या कुळातील, तोरण हा काटेरी, पानगळ होणारा, आधार वृक्षावर पन्नास साठ फूट उंच वाढतो व पसरतो. खोड जाड, मजबूत, तपकिरी रंगाचे, व बारीक भेगाळलेले असते. कोवळ्या फांद्यांवर दाट लव असते. पाने एकांतरीत, साधी, बोर वृक्षाच्या पानासारखीच पण त्याहुन मोठी असतात. पान वरतुन हिरवी, चकचकीत व खालच्या बाजूने फिकट हिरव्या रंगाची असतात. पानाच्या बुडापासुन तिन शिरा निघालेल्या असतात, मधली शिरा सरळ व बाजूच्या वक्राकार झालेल्या असतात. शिरा पानाच्या मागील बाजूस उठावदार असतात. पानांच्या देठा जवळ दोन काटे असतात. त्यातील एक लहान काटा देठाच्या विरुध्द बाजूला व पानाच्या विरुध्द दिशेने वक्राकार झालेला असतो, व एक काटा बुडापासुन सरळ निघालेला असतो. कवळी पान व काटे तांबूस रंगाची असतात. हिवाळ्याच्या शेवटी तोरण फुलु लागतो. फुल बोराच्या वृक्षाला येतात तशीच, सुक्ष्म पिवळसर हिरवट येतात. उन्हाळ्यात फळे येतात. फळ साधारण वाटाण्याच्या आकाराची, एक बी असलेले व बोरासारखी आंबटगोड असतात. फळ म्हणजे रानमेवा.