मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, उष्ण, कोरड्या हवामानात वाढणारा बहुवर्षायु असलेला सदाहरित वेल. विषमोगरी आधार वृक्षावर पसरत जाऊन उंच वाढतो. खोड जाड तपकिरी पिवळसर रंगाचे, बारीक भेगाळलेले असते. फांद्याचा व पानांचा विस्तार दाट असतो. त्यामुळे आधार वृक्ष झाकोळला जातो. पाने साधी, सन्मुख, दोन ते चार इंच लांब, सव्वा ते दोन इंच रुंद व टोकदार, गुळगुळीत असतात. फुल दिड ते दोन सेंटीमीटर व्यासाची, सुंदर, सुवासिक असतात. फुलांच्या पाकळ्यांच्या कडा पांढऱ्या शुभ्र, व आतिल भाग हिरवट रंगाचा असतो. फुलांचा सुगंध मोगऱ्याच्या फुलांसारखा असतो. फुलांची रचना म्हणजे एक प्रकाच्यया कर्णफुलांची असल्यासारखे वाटते. वेल ज्यावेळेस फुलांनी बहरतो त्यावेळेस परिसरात मंद सुगंध दरवळत असतो. गळून पडलेल्या फुलांचा सडा वेला जवळ पडलेला असतो. फुल येण्याचा काळ साधारण फेब्रुवारीपासून तर जून, जुलै पर्यंत असतो. विषमोगरी हा विषारी घटक असलेला व मोगऱ्यासारखा सुगंध असलेला वेल. औषधी गुणधर्म असलेला वेल.