मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. उपलब्ध परिस्थितीनुसार सदाहरित रहातो किंवा पानगळ होते. खोड सरळ, गर्द तपकिरी रंगाचे व त्यावर उभ्या चिरा असतात. पान साधी , लंबगोलाकृती दोन ते सहा इंच लांब व दीड ते तीन इंच रुंद व लहान टोक निघालेले असतात. कवळ्या पानांवर रेशीम लव असते. पानाच्या देठाच्या वरच्या भागात दोन ग्रंथी असतात. पानगळ उन्हाळ्याच्या सुरुवातीला होते. नवीन पालवी मार्चमध्ये येण्यास सुरुवात होते. एप्रिल मे मध्ये सुक्ष्म, पांढरट पिवळसर,फुलांचे तुरे येतात. फुल ५-६ मिलीमीटर आकाराचे, पाकळ्या नसलेले, पाच अगदीच बारीक संदलांचा पेला झालेला व त्यातून डोकावणारे दहा छोटे पुंकेसर असतात. फळधारणा हिवाळ्यात होते व उन्हाळ्यात फळ पिकुन काळपट होऊन गळून पडतात. फळांवर पाच कांगोरे असतात. फळ साधारण एक ते दोन इंच लांब दोन्ही बाजूला निमुळती असतात. अत्यंत महत्त्वाचा व औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.