कमी, मध्यम, अधिक पावसाच्या प्रदेशात, उष्ण, कोरड्या, दमट हवामानात वाढणारा पानगळी होणारा वृक्ष. उंच, विशाल, डौलदार पर्णसंभार असलेला वृक्ष. मुरमाड, खडकाळ, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. खोड काळपट तपकिरी रंगाचे असते. जुन्या खोडाच्या सालीचे साधारण वर्तुळाकृती खवले गळून पडत असतात. खोडावर असंख्य उभ्या चिरा असतात. खोडाला तणावामुळे आढळून येतात. पंधरा वीस फुटापर्यंत खोड, शाखा विरहित असते. फांद्या जमिनीला समांतर असतात, पण शेंडे जमिनीकडे झुकलेले असतात. कवळ्या फांद्यांवर तांबूस लव असते. पाने फांद्यांच्या टोकाला एकवटलेली असतात. पाने मोठी, आठ ते नऊ इंच लांब, पाच ते आठ इंच रुंद असतात. देठकडे निमुळती व टोकाकडे पसरट व बारीक टोक निघालेले असते. पानाच्या कडा लहरी सारख्या काहीशा वळलेल्या असतात. जानेवारी ते मार्च दरम्यान पानगळ होते. पानगळ उपलब्ध परिस्थितीनुसार कमी अधिक काळ असते. नवीन पालवी एप्रिल मे मध्ये येण्यास सुरुवात होते. नवीन पालवी किरमिजी रंगाची व लव असलेली असते. नवीन पालवी बरोबरच अगदीच छोटी हिरवट पिवळ्या रंगाच्या फुलांचे तुरे फांद्यांच्या शेंड्याला दिसू लागतात. फुल केसाळ, पाकळ्या नसलेले असतात. फुलांना एक प्रकारचा दर्प असतो. पावसाळ्याच्या शेवटी फळ येण्यास सुरु होतात. फळ लांबट गोलसर साधारण एक इंच व्यासाची देठाकडे थोडी लांबट निमुळती ,पिवळसर रंगाची असतात. कच्च्या फळांवर तांबूस विटकरी लव असते. फळांवर अस्पष्ट पाच कांगोरे असतात. फळ नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पिकुन गळून खाली पडतात. फळांचा आयुर्वेदामध्ये त्रिफळा चूर्ण ह्या औषधात वापर केला जातो. औषधी गुणधर्म असेल हा वृक्ष.