अर्जुन साल

terminalia arjuna

मध्यम, अधिक, पावसाच्या प्रदेशात वाढणारा, विशाल वृक्ष. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढतो. सरळ उंच विस ते पंचवीस फुट, शाखा विरहित खोड असते. जमिनीलगत खोडाजवळ रुंद व लांब आधार मूळे किंवा तणाव मुळे असतात. ही मूळ जमिनीवर वीस ते पंचवीस फुटापर्यंत वाढलेली दिसून येतात. साल पांढरट, हिरवट, करड्या रंगाची असते. खोडावर जुन्या सालीचे पातळ, लांबट उभे पापुद्रे निघालेले दिसून येतात. पापुद्रे निघालेल्या ठिकाणी पांढरट हिरवट चट्टे दिसतात. साल वरवर काढल्यास हिरवट असते व अंतरसाल लालसर रंगाची असते. पानं साधी, जाडीभरडी , पाच ते नऊ इंच लांबीची व दोन ते अडीच इंच रुंद असतात.‌ पानांच्या कडा साध्या सरळ किंवा हलक्या दातेरी असतात. पान टोकाच्या बाजूला निमुळती व बुडा कडे काहीशी गोलाकार व देठाच्या येथे आतल्या बाजूला खाच पडलेली असतात. देठ अर्धा सेंटीमीटर ते एक सेंटीमीटर असते. त्याच्या टोकाला पण पानांच्या मागे दोन ग्रंथी असतात किती वेळेला देठांच्या टोकावर हि दिसून येतात.‌ जमीन व वातावरणाच्या परिस्थितीनुसार सदाहरित राहतो किंवा अल्पकाळासाठी पानगळ होते. नवीन पालवी बरोबरच उन्हाळ्यात फुलांचे तुरे येतात. देठविरहित किंवा अत्यल्प देठ असलेले, मंद सुगंध असलेल्या पिवळसर छोट्याफुलांचे तुरे पानांच्या बगलेत येतात.‌ फुलांचे जवळुन निरीक्षण केल्यास त्याचे सौंदर्य लक्षात येते. फुलांमध्ये पाकळ्या नसतातच. पाच संदले जोडली जाऊन निरंजनीचा आकार आलेला,व त्यातून सुक्ष्म पुंकेसर बाहेर निघालेले असतात. उभे पंखयुक्त हिरवी फळ, दिड ते दोन इंच उभट व दिड एक इंच रुंद असतात. फळ परिपक्व झाल्यावर गडद तपकिरी रंगाची होतात. फळांमध्ये मध्यभागी एकच बी असते व आजूबाजूला पाच उभे पंख असतात. आयुर्वेदामध्ये वापरला जाणारा, अत्यंत महत्त्वाचा औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.

identity footer