कौशी

sterculia colorata

कमी, मध्यम पावसाच्या प्रदेशात वाढणारा, मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. पानगळ होणारा वृक्ष. खोड सरळ उंच वाढते. फांद्या वृक्षाच्या, शेंड्या च्या वरच्या भागावर जास्त प्रमाणात असतात. साल जाड करड्या रंगाची व खवल्या खवल्यांनी युक्त अशी असते. पानाचा आकार एक सारखा नसतो, ते तीन ते पाच भागात विभागलेली असतात. प्रत्येक भागाला लांबट टोक निघालेले असते. फांद्यांच्या टोकाला पाने एकत्रित येतात. पाने चार ते आठ इंच लांब व पाच ते दहा इंच रुंद असतात. देठ पाच ते दहा इंच लांब असतात. पानाच्या सर्व शिरा देठातुन निघतात, मुख्य तिन ते पाच शिरा असतात, त्या पानाच्या टोकाकडे विभागलेल्या असतात.‌पानगळ हिवाळ्यात होते. वृक्ष बराच काळ निष्पर्ण असतो. नवीन पालवी उन्हाळ्याच्या शेवटी येण्यास सुरुवात होते. मार्चमध्ये फुल येण्यास सुरुवात होते. मे पर्यंत फुलांचा बहर असतो. अतिशय शोभिवंत शेंदरी लाल रंगाची, मखमली फुल, फांद्यांच्या टोकाला लगडलेली असतात. फुल नलीका युक्त टोकाला पाच छोटे त्रिकोणी प्रदल, नलिकेच्या तोडाला उघडलेले, त्यातून एक पुंकेसर टोकाला हिरवट रंगाचा परागकोष असलेला बाहेर निघालेला असतो. अश्या सुंदर रचनेच्या पुष्प धारणेमुळे, कौशी वृक्ष शोभिवंत वृक्षांमध्ये गणला जातो. फुलामधुन निघणाऱ्या स्त्रीकेशरच्या दांडीला पाच बोंडे लटकत असतात. प्रत्येक बोंडात बिया असतात. बोंड फुटुन उघडते,त्याच्या पापुद्र्या सारख्या लांब पातळ फलिकेवर कच्ची बी पक्व होईपर्यंत फलिकेच्या कडेला चिटकुन राहते. फलिका वरुन लाल व आतुन पिवळसर असते. चिकटलेली परीपक्व बी पिवळ्या रंगाची होते. बोंड उन्हाळ्यात उघडते व पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत फलिकेला चिकटलेली बी परीपक्व होते. बी सोलून खातात. औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.

identity footer