मध्यम, आधिक पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये, उष्ण ,कोरड्या हवामानात वाढणारा सदाहरित वृक्ष. उपलब्ध परीस्थिती नुसार, चांगल्या जमिनीत व वातावरणात याची वाढ साधारण साठ ते पासष्ट फुटापर्यंत होते. खोड सरळ उंच वाढते. खोडाची साल पातळ, बऱ्यापैकी गुळगुळीत करडा रंगाची असते. जुन्या वृक्षाची खडबडीत व भेगाळलेली असते. कवळ्या फांद्यांवर फिकट तपकिरी लव असते. पानं विशिष्ट रचनेची व मोठी असतात. पानांच्या कडा अनियमित, वळणावळणाच्या, त्याला अनेक टोकदार कोपरे असतात. पानं वरतून चकचकी हिरवी व खालच्या बाजूने पांढरट हिरवे असतात. खालच्या बाजूने पानांच्या फिकट तपकिरी शिरा स्पष्ट उठून दिसतात. पानांना खालच्या बाजूने दाट लव असते. ह्या पानांचे देठ आठ ते बारा इंच लांब व नेहमीच्या पानांसारखे बुडाला नसून ते पानांच्या जरा मध्ये जोडलेले असते. वैशिष्ट्यपूर्ण रचनेची, मोठी सुगंधी, पांढरी फुलं पानांच्या बगलेत, सप्टेंबर,ऑक्टोबर मध्ये येतात. फेब्रुवारी पर्यंत फुलांचे बहर अधून मधून सुरू असतो. फिकट तपकिरी, पिवळसर रंगाची पाच सुट्टी जाडसर मखमली केसाळ संदले व त्यात पाच पांढरे शुभ्र सुवासिक वर्तुळाकार रचलेल्या सारख्या पाकळ्या असलेली फुल असतात. वाळल्या वर गळून पडलेल्या फुलांना पण सुगंध असतो. बोड प्रकारचे फळ, पाचधारा असलेले खडबडीत आणि लव युक्त असते. असंख्य पंखयुक्त, चपट्या, लांबट बिया फळांमध्ये असतात. फळे पावसाळ्यात येतात व हिवाळ्यात परिपक्व होतात. औषधी गुणधर्म असलेला हा वृक्ष आहे.