करंज

pongamia pinnata

कमी, मध्यम, अधिक पावसाच्या प्रदेशात, मुरमाड,खडकाळ कुठल्याही प्रकारच्या जमिनीत वाढणारा, दाट, डौलदार पर्णसंभार असलेला सदापर्णी वृक्ष. फारच क्वचित ठिकाणी मार्च, एप्रिल दरम्यान पानगळ झालेला दिसून येतो, व लगेचच नवीन पालवी येते. करंज वृक्ष साधारण चाळीस ते साठ फूट उंच वाढतो. उपलब्ध परिस्थिती व वातावरणानुसार कमी अधिक उंचीचा वाढलेला दिसून येतो. खोड फारसे उंच नसते. साल पांढरट हिरवट रंगाची असते. पानं संयुक्त पद्धतीचे, पर्णिकेच्या पाच ते सात जोड्या असतात. पानाच्या टोकाला लांब देठ असलेली, एक पर्णिका असते. पर्णिका अंडाकृती, टोकदार छोटे देठ असलेली बुडा कडे निमुळती झालेली असतात. पर्णिका चकचकीत गर्द हिरवी असतात. पांढरी निळी किंवा किरमीजी रंगाची फुले मे जून मध्ये येतात. फुल पानांच्या बगलेत, फांद्याच्या शेंडांना येतात. फुलांवर संख्येने मधमाश्या दिसू लागतात. करंजी सारख्या दिसणाऱ्या दीड दोन इंच लांब चपट्या जाडसर शेंगा, पुढच्या वर्षीच्या एप्रिल मे महिन्यात तपकिरी रंगाच्या होऊन परिपक्व होतात. करंजी सारखा वक्राकार असल्याकारणाने या वृक्षाला करंज हे नाव पडले आहे. औषधी गुणधर्म असलेला बहुउपयोगी असा हा वृक्ष.

identity footer