मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणारा, सदाहरित, लहान वृक्ष. खोड खुजे, काहीसे ओबडधोबड,गडद तपकिरी रंगाचे. साल खडबडीत असते. खोडाला साधारण पाच सहा फुटांवर फांद्या फुटलेल्या असतात. शाखा उपशाखांच्या रचनेमुळे पर्णसंभार भरगच्च असतो. साधी, संमुख ,लहान देठ असलेली, जाडसर पानं, गुळगुळीत, चकचकीत, लंबगोल व टोक निघालेली असतात. फुलण्याचा काळ जानेवारी ते मार्च दरम्यान असतो. अगदी छोट्या पांढरट फिकट जांभळ्या कळ्यांचे गुच्छ उपशाखांवर येतात. कळ्या फुलल्यावर फुलांची सुंदर रचना नजर खिळवून ठेवते. छोट्या फुलांचे, पांढरट, निळसर, गुलाबी, जांभळट रंगछटा असल्याने हा पुष्प सोहळा खुपच सुंदर असतो. जमीनीवर गळून पडलेल्या फुलांच्या सड्याचे दृश्य आकर्षक असते. उन्हाळ्यात छोट्या गोल फळांचे घोस दिसु लागतात. फळ पिकल्यावर गर्द जांभळ्या रंगाची होतात. फळ चवीला गोडसर असतात फळांमध्ये एकच बी असते. फळ खाण्याच योग्य. पंक्ष्यांना व काही वन्यजीवांना फळ आवडतात. औषधी गुणधर्म असलेला, बहुगुणी, शोभिवंत वृक्ष.