तामण

lagerstroemia speciosa

मध्यम, अधिक पावसाच्या प्रदेशात, चांगल्या प्रतीच्या, जलस्तर चांगला असलेल्या जमिनीत, वाढणारा, डेरेदार पर्णसंभार असलेला वृक्ष. उपलब्ध वातावरणनुसार सदाहरित रहातो किंवा पानगळ होते. खोड कमी उंचीचे असते. साल बऱ्यापैकी गुळगुळीत, पिवळसर करड्या रंगाची असते. सालीचे करड्या रंगाचे पातळ, उभे बारीक पापुद्रे गळून पडत असतात. त्या ठिकाणी पिवळसर गुळगुळीत साल दिसून येते. पान प्रथम दर्शनी पेरुची पानं असल्यासारखे वाटतात. पान मोठी साधारण सहा इंच ते दहा इंच लांब व दोन ते चार इंच रुंद असतात. पानं संमुख, साधी लंबगोलाकार पण टोकदार असतात. पान वरच्या बाजूला गडद हिरवी व खालच्या बाजूला फिकट हिरवी असतात. काही पानांच्या कडा काहीश्या फिकट लालसर रंगाची असतात. पानगळ जमीनीच्या परीस्थिती नुसार होते. काही ठिकाणी पानगळी नंतर लगेचच नवीन पालवी येते तर काही ठिकाणी उन्हाळ्याच्या शेवटी नवीन पालवी येते. फुलण्याचा काळ साधारण एप्रिल महिन्यात असतो पण जमीनीच्या परीस्थिती नुसार तो बदलेला दिसून आला आहे. एक सव्वा फुटाचे फुलोरे फांद्यांच्या शेंड्याला येतात. फुल फुलोऱ्याला खालुन वर शेंड्याकडे उमलत जातात. फुल जांभळट रंगाची असतात. जमीनीच्या परीस्थिती नुसार फुलांचा रंग थोडा कमी जास्त गर्द कींवा फिकट होतांना दिसतो. फुल साधारण दिड इंच व्यासाची, पातळ नाजुक पाकळ्यांच्या कडा झालरीसारख्या वळलेल्या व पाकळीचा आतला भाग खादी कपडा चुरगळलेल्या सारख्या चुण पडलेल्या असतात. संख्येने असलेले पुंकेसर पिवळे दमक असतात. फळ म्हणजे टोकदार कठिण कवचाचे साधारण एक सव्वा इंचाची बोंड असतात. परीपक्व बोंड तपकिरी रंगाची होऊन पाच सहा भागात उकलतात. प्रत्येक उकललेल्या भागात, छोट्या, चपट्या, पंखयुक्त, फिकट तपकिरी बिया संख्येने असतात. तामण वृक्षाचे फुलांना महाराष्ट्र राज्याचे , राज्य पुष्प म्हणून मान मिळाला आहे. हा वृक्ष शोभिवंत वृक्षांमध्ये गणला जातो. औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.

identity footer