मध्यम, अधिक पावसाच्या प्रदेशात वाढणारा हा वृक्ष आहे. मुरमाड, खडकाळ जमिनीत, उष्ण, कोरड्या हवामानात वाढणारा पानगळीचा वृक्ष. तिस ते पन्नास फूट उंच वाढतो. पर्णसंभार दाट, पण आटोपशीर असतो. विशेष म्हणजे पावसाळ्यात इतर वृक्षांना पालवी फुटते, पण वरस वृक्षाची पानगळ होते. पावसाळ्यात वृक्ष पूर्ण बोडका होतो. खोड सरळ, साल तपकिरी रंगाची असते. खोडाला वेड्यावाकड्या चिरा पडुन साल गळून पडत असते. खोडाला सात आठ फुटावर फांद्या फुटलेल्या असतात. पाने संयुक्तप्रकारची एक ते दीड फूट लांब असतात. कोवळ्या पानांच देठ ज्याला पर्णिका चिकटलेल्या असतात ते तपकिरी रंगाचे लव युक्त असतात. नंतर ते लवहीन होतात. पर्णिकांच्या तीन ते पाच जोड्या असतात.पर्णिका मातकट हिरव्या रंगाच्या असतात. पर्णिका देठ रहित व टोकाला एकच लांब देठाची असते. पर्णिकाच्या जोडीची लांबी पानांच्या सुरुवातीला लहान असतात व टोकाकडे मोठ्या होत जातात. पर्णिका जाडसर, खरखरीत व कडा दातेरी असतात. पानांची गर्दी फांद्यांच्या टोकांना असते. फुलांचा हंगाम जानेवारी फेब्रुवारी सुरू होतो आणि एप्रिल पर्यंत असतो.