कमी, मध्यम पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, उष्ण, कोरड्या हवामानात वाढणारा हा काटेरी, सदाहरित वेल किंवा झुडुप म्हणता येईल. सागरगोटा हा प्रचंड दाट पर्णसंभार असलेल, एक महाकाय झुडुप. आधार मिळाल्यास ते फार क्वचित ठिकाणी वेली सारखे वाढलेले दिसुन येते. त्याचा विस्तार इतका दाट असतो की क्वचितच त्याचे खोड दिसते. खोड जाड काळपट तपकिरी रंगाचे, व खालुनच फांद्या वाढुन वेड्यावाकड्या पसरलेल्या असतात. फांद्याचा जसा गुंता झालेला असतो. फांद्यावर अतिशय अणकुचीदार वाकडे काटे असतात. पान मोठी, लांब, संयुक्त पद्धतीचे. पर्णिका अगदीच छोटे देठ असलेल्या, देठा कडे पसरट, टोकाला निमुळती टोक निघालेले, वरून गर्द हिरवी व चमकदार, गुळगुळीत असतात. पानाच्या मधल्या मुख्य शिरेवर पण काटे असतात. हिवाळ्याच्या सुरुवातीला फुलं येण्यास सुरुवात होते. फांद्यांच्या शेवटी व पानांच्या बगलेत पिवळ्या, फुलांचे मोठे फुलोरे येतात. फुल साधारण दोन सेंटीमीटर विस्ताराची असतात. फुलं पाच पाकळ्या असलेली, आठ ते दहा पुंकेसर, मधल्या पाकळीवर लालसर छटा असते. पाच पुष्प बाह्यदल असतात. हिवाळ्याच्या शेवटी फळ दिसु लागतात. फळ चार ते सहा सेंटीमीटर लांब व तिन ते चार सेंटीमीटर रुंद, काटेरी असतात. फळ उन्हाळ्यात परिपक्व होतात व उकलतात. फळांन मध्ये,निळसर करड्या रंगाच्या, दिड सेंटीमीटर व्यासाच्या, एक किंवा दोन टणक, गोलसर, गुळगुळीत, बिया असतात. ह्या बियांना सागरगोटे म्हणतात. बियांचा उपयोग खेळण्यासाठी व औषधांमध्ये करतात. औषधी गुणधर्म असलेले झुडूप.