मध्यम, अधिक पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणार मोठे झुडूप किंवा वृक्ष. गांध्या उंबराची वाढ उपलब्ध परीस्थिती नुसार होत असते. काही ठिकाणी बुंध्याला एक दोन फुटावरच फांद्या फुटलेल्या असतात त्यामुळे वेडवाकडे खोड असल्यासारखे वाटते त्यामुळे मोठे झुडूप असल्यासारखी वाढ दिसते तर काही ठिकाणी खोड सरळ वाढुन वृक्ष वाढलेला दिसून येतो. साल राखाडी रंगाची असते. पाने साधी लंबगोलाकृती पण टोकदार असतात. पानं जाड, वरची बाजू खरखरीत, देठ दाट केस युक्त असते. एक दिड सेंटीमीटर लांबीची, लांब दोन उपपर्णे टोकदार असतात. पानाच्या कडा अखंड किंवा दातेरी असतात. उपलब्ध जमीनीनुसार पानगळ होते. पानगळ डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान होते. पानांच्या मोठ्या आकारामुळे वृक्ष भरगच्च पर्णसंभार असलेला दिसतो. उन्हाळ्यात फुलं येतात. फुलं सुक्ष्म असल्याकारणाने पटकन दिसुन येत नाहीत. उन्हाळ्याच्या शेवटी फळधारणा होते. हलके केसांचे आच्छादन असलेले, अंजीरासारखी फळ एक सव्वा इंच आकाराची असतात. पिकल्यावर ती पिवळसर किंवा मातकट भगव्या रंगाची होतात. औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.