मध्यम उंचीचा, मुरमाड, पाण्याच्या निचरा होणाऱ्या जमिनीत, मध्यम,आधिक पावसाच्या प्रदेशात, कोरड्या , उष्ण, दमट हवामानात वाढणारा पानगळ होणारा वृक्ष. खोड हिरवट पिवळ्या रंगाचे, जसजसे जुने होत जाते तशी साल खडबडीत तपकीरी रंगाची होते. संयुक्त पद्धतीचे साधारण एक ते दीड फूट लांब असते. पर्णिकांच्या चार ते आठ जोड्या असतात. पर्णिका चार ते सहा इंच लांबट व टोकदार असतात. पर्णिकाचा वरील भाग हिरवा असतो. हिवाळ्याच्या शेवटी पानगळ होते. काही ठिकाणी नवीन पालवी प्रथम व नंतर फुले येतात तर काही ठिकाणी प्रथम फुले येतात व नंतर पालवी फुटते. साधारण एप्रिल दरम्यान एक ते दोन फूट लांबीचे पिवळ्या धमक फुलांचे घोस झुंबरासारखे संख्येने झाडाला लटकलेले असतात. ह्या वृक्षाचे हे दृश्य खूपच सुंदर, मन मोहुन टाकणारे असते. फुलांना मंद सुगंध असतो. लांब देठाच्या फुलांना ,पाच पाकळ्या चमच्यासारख्या खोलगट असतात. पुंकेसरांपैकी तीन पुंकेसर लांब वक्रकार व त्यातला एक हिरव्या रंगाचा असतो. पावसाळ्यात शेंगा येण्यास सुरुवात होते. गोलसर नळी सारख्या शेंगा, एखादा इंच गोल, दोन ते अडीच फुटापर्यंत लांब असतात. शेंगांमध्ये गोड कालसर रस असतो. प्रत्येक चपट्या अंडाकृती बि नंतर एक पडदा असतो. शेंगा हिवाळ्याच्या शेवटी परिपक्व झाल्यानंतर काळपट तपकिरी रंगाच्या होतात. शोभिवंत, औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.