मध्यम,अधिक पावसाच्या प्रदेशात वाढणारा वृक्ष. मुरमाड, दगड गोट्यांच्या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. भरदार पर्णसंभाराचा चाळी ते पन्नास फूट उंच वाढतो. काही ठिकाणी कमी उंचीचा, वेडा वाकडा वाढलेला दिसतो कदाचित मानवी हस्तक्षेपामुळे असेल. खोड सरळ, खडबडीत काळसर रंगाची असते. पानांची गर्दी फांद्यांच्या टोकाकडे असते. पण एकांतरीत, लांबट, देठाकडे निमुळती, टोकाकडे पसरट व अगदी छोटे टोक निघालेले असतात. पानसाधारण एक फुट लांब आणि पाच ते सहा इंच रुंद व कडा बारीक दातेरी असलेल्या, काहीशा झालरी सारख्या वळलेल्या असतात. हिवाळ्याच्या मध्यात पिकलेली पानं लाल भगव्या रंगछटांची होतात. हिवाळ्याच्या शेवटी पान गळून पडतात. नवीन पालवी येण्याचा कालावधी जमीन व वातावरणानुसार कमी अधिक असतो. नवीन पालवी पिवळसर तपकिरी रंगाची येण्यास सुरुवात होते, नंतर फिकट हिरव्या रंगाची होतात. पालवी आगोदर किंवा पालवी बरोबर फांद्यांच्या टोकाशी फुले येण्यास सुरुवात होते. फुलं पिवळसर,पांढरी, तळाशी चार पाकळ्या व संख्येने तांबूस रंगाचे पुंकेशर असलेली असतात. फुलं आकर्षित असतात पण त्यांना दुर्गंध असतो. उन्हाळ्याच्या शेवटी फळ येण्यास सुरुवात होते. फळांचा आकार कुंभा सारखा म्हणजेच गोल छोट्या तोंडाचे उभट मडक असल्या सारखा असतो. फळांमध्ये भरपूर घर उभी असतात. फळ जनावरांना आवडतात. फळ जनावरांनी अधिक खाल्ल्यास त्यांना गुंगी येते. औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.