बांबू जंगलातील एक महत्वाचा घटक. बांबूचे जगभरात दिड हजार हुन अधिक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराचे वेगवेगळे शास्त्रीय नाव आहे. भारतात शंभरच्या वरती बांबूचे प्रकार आहेत. बांबू कमी, मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, उष्ण, कोरड्या, दमट हवामानात, मुरमाड, दगडगोटे असलेल्या व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढतो. उपलब्ध वातावरणनुसार तो सदाहरित, निमसदाहरित किंवा पानगळ होणारा असतो. उन सावली असलेल्या जागेत चांगला वाढतो. बांबू ही गवतकुळाती बहुवर्षायू, असलेली वनस्पती आहे. बांबूचे भुमिगत आढवे वाढणारे रायझोम म्हणजे त्याचे भुमिगत खोड असते. त्या आढव्या खोडाला संख्येने उभे, बांबूच्या प्रजातीनुसार, उच ,लहान, बारीक किंवा जाड खांबासारखे उभे फुटवे फुटलेले असतात. त्या फुटव्यांना बांबू हा शब्द प्रयोग केला जातो. त्या पुर्ण संख्येने, एकत्रित आलेल्या खांबासारख्या उंच फुटव्यांना बांबूचे बेट म्हटले जाते. बांबू मध्ये पाच सहा फूटा पासून ते शंभरफुटा पेक्षा उंच वाढणारे असे विविध प्रकार आहेत. बांबू जरी गवत कुळातील असला तरी त्याच्या काष्टमय खोड, उंची, देठ असलेली पाने, फुल येण्याचा काळ व फुलांची रचना ह्या गोष्टी त्याला गवतापासून वेगळ्या ठरवतात. बांबूची वाढ हि सुरवातीला एक दोन वर्ष हळु व नंतर झपाट्याने होते. पावसाळ्यात बांबूला चांगली वाढ असते. उपलब्ध परिस्थितीनुसार काही ठिकाणी त्याच्या वाढीची प्रक्रिया वर्षभर पण सुरू असते. बांबूचे पानांनाची रचना खालच्या बाजूला गोलाकार टोकाला निमुळती टोकदार असतात. पानाच्या कडा खरखरीत असतात. प्रजाती निहाय पानांच्या लांबी रुंदी मध्ये फक्त फरक असतो. बांबू त्याच्या आयुष्यात एकदाच फुलतो व बिजधारणा झाल्यावर सुकुन जातो. प्रजाती नुसार तिस ते सत्तर वर्ष वयाच्या बांबूला सुक्ष्म फुलं संख्येने फुलोऱ्यात येतात. फुल येण्याच्या आदल्या वर्षी बांबूचे नवीन फुटवे त्या बांबू बेटांना येत नाही, हे त्यांचे पुढच्या वर्षी फुल येण्याचे लक्षण असते. बी गव्हा सारखे असते. बहुगुणी, बहुउपयोगी अशी ही बांबू वनस्पती.