कमी पावसाच्या प्रदेशात, उष्ण कोरड्या हवामानात वाढणारा काटेरी वृक्ष. दहा ते पंधरा फुट वाढणारा, फार कमी ठिकाणी साधारण पंचवीस फुट उंच वाढलेला दिसतो. मुरमाड ,पांढरट, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत वाढणारा वृक्ष. काही ठिकाणी पडीत जमीन वर वाढलेला दिसुन आला आहे. याच्या फांद्या जास्त मोठ्या नसतात. फांद्या खोडाला जमीनीपासुनच फुटलेल्या असतात. फांद्यां वरच्या दिशेने वाढुन, शेंड्याची बाजु जमिनीकडे झुकलेली असतात. बुंध्याच्या भवती दाटीने असलेल्या छोट्या फांद्यांन मुळे ह्या वृक्षाचा पर्णसंभाराचा विस्तार हा बाजुला जास्त पसरलेला नसतो. बुंद्याचा सालीचा रंग मळकट पिवळा किंवा हिरवट पिवळा असतो. पानं लहान साधारण दिड एक इंच लांबट वर्तुळाकार, जाडसर असतात. पानांच्या बेचक्यात वरच्या दिशेला मोठे एक ते दोन इंच लांब, अनुकुचीदार जाड मजबूत काटे असतात. पानगळ हिवाळ्यात होते. नवी पालवी उन्हाळ्याच्या सुरुवातीला येण्यास सुरुवात होते. उन्हाळ्यात छोटी हिरवट, पांढरी सुवासिक फुले छोट्या फुलोऱ्यात येतात. फुलांची सुंदर नैसर्गिक रचना असते. फळधारणा उन्हाळ्याच्या शेवटी होते. फळ लांबट गोल कठीण कवचाची सुरवातीला हिरवी पिकल्यावर तपकिरी रंगाची असतात. फळावर पाच उभ्या उथळ खाचा असतात. औषधी गुणधर्म असलेला हा वृक्ष. आता बऱ्याच ठिकाणी हा संख्येने कमी होत चाललेला दिसून येतो. ह्या वृक्षांमध्ये व नेपती या झुडुपामध्ये निरीक्षण करताना एक बाब दिसुन आली आहे. ज्या ठिकाणी हिंगण बेटाचे झाड असते त्याच्याच थोडं बहुत अंतरावर नेपतीच झुडूप हे दिसून येतच. किंवा ज्या ठिकाणी नेपती चे झुडप असतात त्या ठिकाणी एखादा दुसरा हिंगणबेटाचा वृक्ष दिसतो.