कमी, मध्यम,जास्त पावसाच्या प्रदेशात, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, वाढणारा,आकर्षक, दाट पर्णसंभार असलेला, चिकवर्गीय, सदाहरित वृक्ष. खोड सरळ उंच वाढणारे, खोडाची साल खडबडीत,भुरकट राखाडी रंगाची, भुसभुशीत असते. पानं साधी, मोठी, लांबट, टोकदार, वरच्या बाजूने चकचकीत हिरवीगार, तर खालच्या बाजूला फिकट हिरवी दिसतात. मुख्य मध्य शिरेच्या दोन्ही बाजूंना असंख्य समांतर शिरा स्पष्ट दिसून येतात. सप्तपर्णीला पावसाळ्यात फुलं येतात. हिरवटपांढरी फुलं, दाटीने, फुलोऱ्यात फांद्यांच्या टोकाशी येतात. फुलांच्या उग्र सुवासामुळे वृक्ष फुलल्याचे लक्षात येते. फुलांवर मधमाशा व मध खाणारे पक्षी दिसुन येतात. सप्तपर्णीचे फळ म्हणजे लांबट नाजूक, चवळीच्या शेंगेसारखी दिसणारी असतात. एका फुलापासून दोन जोड शेंगा तयार होतात. त्यामुळे एका फुलोऱ्या च्या ठिकाणी असंख्य शेंगा लोबतांना दिसतात. अशा असंख्य लटकलेल्या झुपक्यांमुळे, वृक्षाचे रुप काही वेगळेच दिसते. फळे उकलून त्यातील असंख्य, सुक्ष्म, हलक्या, चपट्या, केसाळ बिया इतरत्र उडलेल्या दिसुन येतात. ह्या वृक्षाची लागवड योग्य ठिकाणी करावी कारण फुलांना असलेल्या उग्र सुवासा मुळे काही लोकांना एलर्जी होऊन डोकेदुखी होते. औषधी गुणधर्म असलेला शोभिवंत वृक्ष.