कमी, मध्यम पावसाच्या प्रदेशात वाढणारा हा वृक्ष. मुरमाड ,खडकाळ,पांढरट हलक्या प्रतीचे जमिनीत उष्ण कोरड्या हवामानात चांगल्या प्रकारे वाढतो. उंच व विशाल पर्ण संभार असलेला पानगळीचा वृक्ष असून खोड सरळ उंच असते. पांढरट करड्या रंगाची साल काही ठिकाणी जुन्या खोडावर काळपट रंगाची असते. साल खडबडीत व उग्र वासाची असते. फांद्या शेंडा कडे अधिक असतात. पान संयुक्त पद्धतीचे व लांब असतात. पर्णिकांच्या आठ ते अकरा जोड्या असतात. पानांच्या टोकाकडच्या पर्णिकांची जोडी वेगवेगळ्या लांबी रुंदीचे असते. पर्णिका कडुलिंबाच्या पर्णिकांच्या रचने सारख्या असतात पण त्यापेक्षा मोठ्या असतात. पर्णिकांना चुरगळल्यास भाजलेल्या शेंगदाण्या सारखा वास येतो. पर्णिका चार ते सहा इंच लांब व दोन इंच रुंद आणि दातेरी कडा असलेल्या टोकदार असतात. हिवाळ्याच्या शेवटी पानगळ होते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला फुलण्याचा हंगाम असतो. हिरवट पिवळसर रंगाचे सूक्ष्म फुलांचे बहुशाकीय गुच्छ येतात. फुलांची रचना सुंदर असते. उन्हाळ्यात फळ येतात. फळ म्हणजे चपट्या पातळ व मध्यभागी बी असलेल्या ठिकाणी काहीशा फुगीर, एखाद्या इंच लांबीच्या शेंगा, देठाकडे पीळ पडलेल्या असतात. शेंगा संख्येने लटकलेल्या असतात. शेंगा उन्हाळ्याच्या शेवटी परिपक्व होतात. उग्र वासामुळे चराई क्षेत्रात जनावरांपासून धोका नसलेला वृक्ष. डोंगर उताराला लागवड करून मातीची धूप थांबवण्यासाठी हा वृक्ष उपयुक्त आहे. औषधी गुणधर्म असलेला वृक्ष.