मध्यम, जास्त पावसाच्या प्रदेशात, मुरमाड, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत, उष्ण, कोरड्या, दमट हवामानात वाढणारा वृक्ष. उंच सरळ वाढणारा वृक्ष. खोड सरळ, काही अंशी खडबडीत, साल तपकिरी, करड्या रंगाची असते. खोड बऱ्याच उंचीपर्यंत फांद्यारहीत असते. फांद्या शेंड्याकडे एकवटलेल्या असतात. पानं मोठी, द्विसंयुक्त पध्दतीचे असतात. असंख्य पर्णिका असलेले पान साधारण दिड ते अडीच फुटापर्यंत लांबीचे असतात. कवळी पाने लालसर नारंगी रंगाची, नंतर तजेलदार पोपटी हिरवी होतात. हिवाळ्यात पानगळ होते. हिवाळ्याच्या शेवटी फांद्यांच्या टोकाशी फुलोरे येतात. हिरवट, लालसर फुलोऱ्या नंतर, नवीन लाल, नारंगी रंगाची पालवी लगेचच येऊ लागते. फुलोरे आकाराने गव्हाच्या कणसा सारखे पण मोठे, सात ते आठ इंच असतात. फुलोऱ्यात असंख्य एक सेंटीमीटर लांबीचे फुल असतात. फुलाच्या रंगसंगती मुळे अर्धवट उमललेले फुलोरे पोपटी व लाल रंगाची, व काही पुढच्या बाजूला पुर्ण उमललेली लाल रंगाचे पुंकेसर बाहेर आल्या कारणाने लाल रंगाचे दिसते. ते झाडावर लटकलेली सुंदर दिसतात. उन्हाळ्याच्या शेवटी वृक्षाच्या शेंड्याला शेंगांचे घोस दिसु लागतात. शेंगा चपट्या सहा ते आठ इंच लांब, टोकदार, परिपक्व झाल्यावर काळपट तपकिरी रंगाच्या होतात. बिया लहान चपट्या काळपट रंगाच्या असतात. ज्यावेळेस टोकफळाला फुलोरे असतात, त्यावेळी फुलांन मधुन निघणारे मध खाण्यासाठी पोपटांची झुंबड झाडावर दिसून येते.